- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- नवी मुंबईत साताऱ्याच्या ‘बावधन बगाड’ यात्रेचा देखणा अविष्कार; ‘गोड गणपती’च्या सजावटीने वेधले लक्ष
नवी मुंबईत साताऱ्याच्या ‘बावधन बगाड’ यात्रेचा देखणा अविष्कार; ‘गोड गणपती’च्या सजावटीने वेधले लक्ष
नवी मुंबई कोपरखैरणे येथील माऊली मंडळाने साताऱ्याच्या बावधन बगाड यात्रेची २० फूट प्रतिकृती साकारली. वाचा सविस्तर बातमी.
नवी मुंबई: गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय आणि उत्साही वातावरण पाहायला मिळते. मुंबई आणि नवी मुंबई सारख्या महानगरांमध्ये दरवर्षी विविध आकर्षक देखावे, सामाजिक संदेश देणाऱ्या सजावराती आणि पारंपरिक संस्कृतीची अनोखी झलक पाहायला मिळते. यंदाही अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात आणल्या आहेत. यातच नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरातील ‘माऊली सार्वजनिक उत्सव मंडळाने’ साकारलेली संकल्पना सध्या सर्वत्र कौतुकाचा विषय ठरली आहे. या मंडळाने सातारा जिल्ह्यातील अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक असणाऱ्या ‘बावधन बगाड यात्रेची’ हुबेहूब आणि तब्बल २० फूट उंचीची प्रतिकृती कोपरखैरणेत साकारून उपस्थितांचे डोەपेत दीपवून टाकले आहे. केवळ सोशल मीडिया वरील रील्स आणि छायाचित्रांवर पाहण्यापेक्षा आपल्या परिसरातील नागरिकांना या संस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, या उदात्त हेतूने हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात या मंडळाने सातारा जिल्ह्यातील बावधन गावातील बगाड यात्रेची परंपरा अत्यंत हुबेहूब उभी केली आहे. गणेश आगमनाच्या आदल्या दिवशी बावधनच्या पारंपरिक शाही छबिना आणि पालखी सोहळ्याचे विलोभनीय रूप कोपरखैरणेत साकारण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष आगमनाच्या दिवशी मंडळाच्या गणपती बाप्पाची मूर्ती या बगाडावर विराजमान करून अत्यंत वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे, या संपूर्ण सोहळ्यात कोणतीही आधुनिक डीजे किंवा बँजोची कर्णकर्कश धून न वापरता पूर्णपणे पारंपरिक वाद्यांचा गजर करण्यात आला. या सोहळ्यासाठी थेट बावधन गावातून २० वादक मंडळी आणि मर्दानी खेळांचे पथक पाचारण करण्यात आले होते. पारंपारिक वाद्यांचा नाद, मर्दानी खेळांची कसरती आणि यात्रेची २० फूट उंच प्रतिकृती यामुळे या भागातील गणेशोत्सवाला एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक रूप प्राप्त झाले आहे.
या भव्य उत्सवामागे एका छोट्या चवळीच्या कट्ट्या पासून सुरू झालेला मोठा संघर्षमय प्रवास दडलेला आहे. २०११ मध्ये कोपरखैरणे येथील एका चाळीतील काही लहान मुलांनी एकत्र येऊन स्वतःचा गणेशोत्सव साजरा करण्याचे स्वप्न पाहिले होते. सुरुवातीला चाळीच्या लहानशा ऑफिस मध्ये बाप्पाची स्थापना करून या प्रवासाची सुरुवात झाली. काळानुसार मुलं मोठी होत गेली आणि त्यांची जिद्द व संघटनशक्तीही अधिक प्रगल्भ होत गेली. याच जिद्दीच्या बळावर कोपरखैरणे सेक्टर ३ मधील हा छोटासा गणेशोत्सव आज संपूर्ण नवी मुंबईत ‘गोड गणपती’ म्हणून मोठ्या आदराने ओळखला जाऊ लागला आहे. २०२२ मध्ये मंडळाने पहिल्यांदाच उभी गणेशमूर्ती आणून एका अत्यंत अरुंद चाळीतून १४ फूट उंचीच्या ‘गोड गणपती’चा प्रवास यशस्वीरीत्या सुरू केला होता. यंदा मात्र त्याही पुढे जात पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने बाप्पाचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेत तब्बल पाच महिने परिश्रम करून सातारा जिल्ह्यातील बावधन बगाड यात्रेची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली. मे महिन्यात बावधन गावातील मानकरी आणि ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा करून यात्रेचा सखोल अभ्यास करण्यात आला होता, ज्याचा प्रत्यक्ष फायदा ही प्रतिकृती उभारताना झाला.
माऊली सार्वजनिक उत्सव मंडळाने आगामी काळात एका मोठ्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमाचे नियोजन केले आहे. त्यानुसार पुढील पाच वर्षांत ‘महाराष्ट्रातील पाच मोठ्या यात्रा’ या संकल्पनेवर आधारित विविध देखावे साकारण्याचे मंडळाचे नियोजन आहे, ज्याचाच एक भाग म्हणून यंदा बावधन बगाड यात्रेची निवड करण्यात आली होती. विशेष म्हणजे, हा गणेशोत्सव केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित न ठेवता या मंडळाकडून वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले जातात. यामुळे गणेशोत्सवाचा आनंद घेतानाच सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे एक आदर्श उदाहरण या तरुण मंडळाने घालून दिले असून, त्यांच्या या संस्कृती प्रेमी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
