- Hindi News
- सातारा
- साताऱ्यात गणेश विसर्जनासाठी वाहतुकीत मोठे बदल; प्रमुख मार्गांवर नो एन्ट्री
साताऱ्यात गणेश विसर्जनासाठी वाहतुकीत मोठे बदल; प्रमुख मार्गांवर नो एन्ट्री
सातारा शहरात २४ ते २६ सप्टेंबर दरम्यान गणेश विसर्जना निमित्त वाहतुकीत मोठे बदल. प्रमुख रस्ते बंद असून पर्यायी मार्ग आणि पार्किंगची सोय जाहीर.
सातारा : सातारा शहरात २४ आणि २५ सप्टेंबर २०२६ रोजी गणेश विसर्जन होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविक, गणेशभक्त आणि वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. विसर्जन मिरवणुका सुरळीत पार पडाव्यात, वाहतूक कोंडी तसेच अपघात टाळता यावेत आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. २४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून २६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.
सातारा शहरातील राजपथावरील कमानी हौद, देवी चौक, मारवाडी चौक ते मोती चौक या मार्गावर दोन्ही दिशेने सर्व वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. तसेच कमानी हौद ते शेटे चौक, कर्मवीर भाऊराव पाटील पथावरील शेटे चौक ते शनिवार चौकमार्गे मोती चौक, तसेच मोती चौक ते एम.एस.ई.बी. कार्यालय, समर्थ टॉकीज, राधिका टॉकीज चौक, ऐक्य प्रेस कॉर्नर, बुधवार नाका चौक, गणेश विसर्जन कृत्रिम तलाव आणि कै. किसन बा. आंदेकर चौक, करंजे पेठ या मार्गावरही वाहतुकीला प्रवेशबंदी करण्यात आली आहे. स्टेट बँक प्रतापगंज पेठ परिसरातील काटदरे मसाले दुकान ते डीसीसी बँक, मोती तळे आणि मोळाचा ओढा ते बुधवार नाका या मार्गावरील शाहूपुरी पोलीस ठाणे ते बुधवार नाका दरम्यानही वाहतूक बंद राहणार आहे.
याशिवाय समर्थ मंदिर ते चांदणी चौक हा मार्ग हलक्या तसेच अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. बोगदा-समर्थ मंदिर ते शाहू चौक या मार्गावरही सर्व प्रकारच्या वाहनांना, एसटी बससह, प्रवेश करता येणार नाही. त्यामुळे सातारा शहरातून सज्जनगड आणि कास पठाराच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना गोडोली नाका, शिवराज पेट्रोल पंप, खिंडवाडी, शेंद्रे-सोनगाव फाटा आणि बोगदा या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
मोळाच्या ओढ्याकडून सातारा शहरात येणारी वाहने महानुभव मठ, करंजे आणि भूविकास बँक चौकमार्गे पुढे जातील. कोटेश्वर मंदिर, राधिका टॉकीज चौक आणि राधिका रोडकडून एसटी बसस्थानकाच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठीही पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. मोती चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना शाहू चौक, अदालतवाडा मार्गे समर्थ मंदिराच्या दिशेने वळवण्यात येणार आहे. तसेच कास, यवतेश्वर आणि सज्जनगड, सोनगाव फाटामार्गे सातारा शहरात येणाऱ्या वाहनांनी शेंद्रे-शिवराज मार्गाचा वापर करावा, असे पोलिसांनी कळवले आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर वाहन पार्किंगलाही बंदी असणार आहे. राजवाडा, मोती चौक, देवी चौक, कमानी हौद, शेटे चौक, शनिवार चौक, मोती चौक, राधिका चौक, बुधवार नाका आणि गणेश विसर्जन तळे या प्रमुख मार्गावर दुचाकी व चारचाकी वाहने उभी करता येणार नाहीत. या मार्गावर राहणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने विसर्जन मार्गापासून दूर असलेल्या पर्यायी ठिकाणी पार्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेश विसर्जन पाहण्यासाठी शहरात येणाऱ्या नागरिकांसाठी तालिम संघाजवळील मैदान आणि कोटेश्वर मैदान येथे वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी नागरिकांनी निर्धारित पार्किंगच्या ठिकाणांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, वाहतूक निर्बंधातून रुग्णवाहिका, पोलीस वाहने आणि अग्निशामक दलाच्या वाहनांना वगळण्यात आले आहे. सातारा शहरातील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या तात्पुरत्या वाहतूक बदलांची नागरिकांनी नोंद घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी केले आहे.
