- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- महायुतीत पुन्हा खडाजंगी? मुंबई बँकेत शिंदे गटाची तयारी, पुण्यात भाजपचा स्वबळाचा इशारा
महायुतीत पुन्हा खडाजंगी? मुंबई बँकेत शिंदे गटाची तयारी, पुण्यात भाजपचा स्वबळाचा इशारा
महायुतीत अंतर्गत चुरस वाढली. मुंबई बँकेच्या निवडणुकीत शिंदे गटाची मोर्चेबांधणी, तर पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपचा स्वबळाचा इशारा.
मुंबई : राज्यातील आगामी सहकार आणि विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील राजकीय घडामोडींना अचानक वेग आला आहे. एका बाजूला मुंबई बँकेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने थेट उडी घेत जोरदार तयारी सुरू केल्यामुळे भाजप समोर एक नवीन राजकीय समीकरण उभे ठाकले आहे, तर दुसरीकडे पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीत भाजपने गरज पडल्यास स्वबळावर लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मुंबईच्या सहकार राजकारणापासून ते पुण्याच्या पदवीधर निवडणुकां पर्यंत निर्माण झालेल्या या नव्या राजकीय घडामोडींमुळे आगामी काळातील महायुती मधील जागावाटप आणि युतीचे भवितव्य चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
मुंबई बँकेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने सहकार क्षेत्रातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. सध्या मुंबई बँकेच्या संपूर्ण कारभारात भाजप नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील गटाचे मजबूत वर्चस्व असल्याचे मानले जाते. मात्र, आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शिवसेना शिंदे गटाने आता या राजकीय मैदानात उतरण्याची पूर्ण तयारी चालवली आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून नुकतीच बाळासाहेब भवन येथे शिवसेना शिंदे गटाची एक अत्यंत महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई बँक निवडणुकीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली असून पक्षाने आपली मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. ही बहुचर्चित निवडणूक २०२६ च्या अखेरीस किंवा २०२७ च्या सुरुवातीला पार पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदानाला अवकाश असला तरी शिंदे गटाने आधीच कंबर कसल्यामुळे भाजप आणि शिंदे यांच्यातील राजकीय समिकरणांवर याचा कसा परिणाम होतो, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, मुंबई पाठोपाठ पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या आगामी निवडणुकांवरही राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. पंढरपूर येथे एका कार्यक्रमा दरम्यान बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या निवडणुकी बाबत भाजपची भूमिका अत्यंत स्पष्ट शब्दांत मांडली. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची ही निवडणूक महायुती म्हणून एकत्रितपणे लढवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले. परंतु, जर स्थानिक पातळीवर किंवा राजकीय समीकरणां नुसार गरज भासलीच, तर भारतीय जनता पार्टी या दोन्ही मतदारसंघात स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यासाठी पूर्णपणे सज्ज आणि तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मतदारसंघांमधील अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष संयुक्तपणे घेतील, असे सांगत त्यांनी सत्तेतील समतोलाची बाजू मांडली. दरम्यान, पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघांसाठी २०२६ च्या अंतिम मतदार याद्याही प्रशासनाने नुकत्याच अधिकृतपणे जाहीर केल्या आहेत, त्यामुळे सर्वपक्षीय तयारीला आता गती मिळाली आहे.
एकीकडे सहकार क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई बँक निवडणुकीत शिंदे गटाच्या संभाव्य एन्ट्रीमुळे युतीमध्ये अंतर्गत चुरस वाढण्याची चिन्हे आहेत, तर दुसरीकडे पुण्यात भाजपच्या स्वबळाच्या भूमिकेमुळे महायुतीतील जागा वाटपाचा पेच पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आगामी काळात या दोन्ही महत्त्वाच्या निवडणुकां बाबत राज्यातील वरिष्ठ नेतेमंडळी नेमकी काय भूमिका घेतात आणि कोणता अंतिम तोडगा काढतात, यावरच महायुतीचे आगामी राजकीय चित्र अवलंबून असणार आहे.
