व्हॉट्सॲपवर कंपनी मालक बनून १.१५ कोटींचा गंडा; पुणे सायबर पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश, ५ जण जेरबंद

पुण्यात व्हॉट्सॲपवरून १.१५ कोटींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. पुणे सायबर पोलिसांकडून ५ जणांना अटक, मुख्य आरोपीचे चीन कनेक्शन उघड.

पुणे: कंपनीचा मालक असल्याचे भासवून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून थेट अकाउंट मॅनेजरला विविध बँक खात्यांवर पैसे वर्ग करण्यास सांगत तब्बल १ कोटी १५ लाखांची मोठी आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका सायबर गुन्हेगारी टोळीचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गंभीर प्रकरणाची अत्यंत वेगाने तांत्रिक बाजू हाताळत पोलिसांनी ५ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, तर फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी ५० लाख २६ हजार १९१ रुपये परत मिळवण्यात मोठे यश आले आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण रॅकेटमधील एका मुख्य आरोपीचे थेट चीनशी आर्थिक कनेक्शन असल्याचे तपासात उघडकीस आल्याने सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे.

        पुणे सायबर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या सविस्तर गुन्ह्यानुसार, तक्रारदार एका कंपनीत अकाउंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. भामट्यांनी अत्यंत चलाखीने व्हॉट्सॲपवर कंपनीच्या मालकाचा प्रोफाईल वापरून त्यांच्याशी संपर्क साधला आणि आपणच कंपनीचे मालक असल्याचा बनाव रचला. त्यानंतर कंपनीच्या अत्यंत निकडीच्या कामासाठी म्हणून वेगवेगळ्या बँक खात्यांवर वारंवार १ कोटी १५ लाख रुपये वर्ग करण्यास भाग पाडले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने तातडीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे सायबर पोलिसांनी ज्या-ज्या बँक खात्यांवर ही रक्कम वर्ग झाली होती, त्या सर्व संबंधित बँकांशी तातडीने ई-मेलद्वारे संपर्क साधला आणि ती खाती तत्काळ डेबिट व लियन (Lien) करण्याची प्रभावी कारवाई केली.

        पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. बँकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे देशभरातून ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील आरोपी क्रमांक ५ असलेला रोहन रामेश्वर जाधव (रा. संभाजीनगर) याची कसून चौकशी केली असता, त्याचे थेट चीनशी कनेक्शन असल्याचे धक्कादायक तथ्य समोर आले आहे. या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळ्याचा आणि १ कोटी रुपयांच्या पुढील व्यवहारांचा सखोल तपास सध्या सायबर पोलिसां कडून सुरू आहे. कायदेशीर प्रक्रिया पार पाडत पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशा नुसार आणि शासनाच्या एमआरएम (MRM) पोर्टलद्वारे ४७ लाख ६४ हजार १९१ रुपये तातडीने जप्त करून परत मिळवले आहेत. याशिवाय आणखी २ लाख ५० हजार रुपये परत मिळवून देण्यासाठी प्रशासकीय प्रस्ताव सादर करण्यात आला असून, एकूण ५० लाखांहून अधिक रक्कम परत मिळवण्याची कारवाई कायदेशीररीत्या पूर्ण झाली आहे.

         ही यशस्वी धडक कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त आर्थिक व सायबर गुन्हे विवेक मासाळ आणि सहायक पोलीस आयुक्त शुभदा संखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या सूचनेनुसार तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संगिता देवकाते, पोलीस उपनिरीक्षक सुशील उमरे, पोलीस अंमलदार संदेश कर्णे, राजुदास चव्हाण, प्रशांत बोन्हाडे, प्रवीणसिंग राजपूत, शितल डांगे, श्रीकृष्ण नागटिळक, सोनाली चव्हाण, सतीश मांढे आणि कृष्णा मार्कड यांच्या पथकाने ही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आणि विशेषतः कॉर्पोरेट कंपन्यां मधील आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. व्हॉट्सॲप किंवा इतर सोशल मीडिया वरून कंपनीच्या मालकांच्या किंवा उच्च पदस्थांच्या नावाने पैशांची मागणी झाल्यास कोणत्याही दबावाखाली न येता संबंधित व्यक्तीशी प्रत्यक्ष फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून खात्री केल्याशिवाय कुठलेही आर्थिक व्यवहार करू नयेत, असे स्पष्ट निर्देश सायबर विभागाने दिले आहेत.

 

 

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणासाठी उद्या दुपारी दोन तास वाहतूक पूर्णपणे बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Latest News

दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणासाठी उद्या दुपारी दोन तास वाहतूक पूर्णपणे बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन दिवेघाटातील रस्ता रुंदीकरणासाठी उद्या दुपारी दोन तास वाहतूक पूर्णपणे बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
पुणे: पुणे-सासवड मार्गावरील दिवेघाट परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. या कामांतर्गत येत्या बुधवारी (२३ सप्टेंबर २०२६) दिवेघाटात ब्लास्टिंग...
माजी न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण यांचा समान नागरी कायदा समितीच्या राजीनामा; कार्यपद्धतीवर आक्षेप
राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू; फडणवीसांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश
व्हॉट्सॲपवर कंपनी मालक बनून १.१५ कोटींचा गंडा; पुणे सायबर पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश, ५ जण जेरबंद
सिंहगड रोडवर गुन्हे शाखेचा दणका; गावठी पिस्तूल-काडतुसांसह सराईत जेरबंद, पुरवठादारही अटकेत

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software