- Hindi News
- सातारा
- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांचा मोठा दणका; २०१ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांचा मोठा दणका; २०१ सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी २०१ सराईत गुन्हेगारांना हद्दपार केले असून ७४१ जणांना नोटीसा बजावल्या आहेत.
सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका लावला आहे. गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडाव्यात आणि उत्सवा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर विविध प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये २०१ सराईत गुन्हेगारांना हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील तसेच सातारा शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने गणेशोत्सवाच्या काळात संवेदनशील व्यक्तींवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग होऊ नये, गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये, यासाठी ही प्रतिबंधात्मक मोहीम राबवण्यात आली.
महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ५५ अन्वये ७ टोळ्यांमधील ७७ जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये काही व्यक्तींना सहा महिन्यांसाठी, तर एका व्यक्तीला तीन महिन्यांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ५६ अंतर्गत दोन प्रस्ताव, कलम ५७ अंतर्गत एक प्रस्ताव आणि एमपीडीए अंतर्गत एका प्रस्तावाची कारवाई करण्यात आली आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३(२) अन्वये २०१ प्रस्ताव दाखल करण्यात आले असून, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२२ अंतर्गत १४ कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १२६ अंतर्गत ६१ प्रस्ताव, कलम १२९ अंतर्गत आठ प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. कलम १६८ अंतर्गत तब्बल ७४१ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
हद्दपारीच्या आदेशा नुसार संबंधित २०१ सराईत गुन्हेगारांना २४ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजल्या पासून २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सातारा शहर आणि सातारा तालुका पोलीस हद्दीत प्रवेश करण्यास तसेच वास्तव्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होणार असल्याने पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने विशेष बंदोबस्त आणि प्रतिबंधात्मक कारवाईवर भर देण्यात आला आहे. उत्सवादरम्यान शांतता भंग करणाऱ्या तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसां कडून देण्यात आला आहे.
Top of Form
Bottom of Form
