- Hindi News
- पुणे
- हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी
हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेला वेग; ‘डी-१५ ब्लॉक’चा पहिला टप्पा यशस्वी
पुणे रेल्वे विभागाच्या हडपसर-घोरपडी तिसऱ्या मार्गिकेचे 'डी-१५ ब्लॉक'मधील महत्त्वाचे काम यशस्वी. प्रवाशांचा प्रवास होणार अधिक वेगवान.
पुणे: पुण्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी रेल्वे प्रशासना कडून हाती घेण्यात आलेल्या पायाभूत प्रकल्पांना आता वेगाने यश मिळत आहे. पुणे रेल्वे विभागांतर्गत अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या हडपसर-घोरपडी तिसऱ्या रेल्वे मार्गिकेच्या (Hadapsar Ghorpadi 3rd Railway Line) उभारणीसाठी नियोजित असलेल्या ‘डी-१५ ब्लॉक’मधील पहिल्या दिवसाचे अत्यंत गुंतागुंतीचे आणि महत्त्वाचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. या पहिल्या टप्प्यात अप आणि डाऊन मुख्य मार्गावरील क्रॉसओव्हर पॉईंट्स सुरक्षितपणे हटवून संपूर्ण मार्गिका ‘प्लेन ट्रॅक’मध्ये रूपांतरित करण्यात आली असून, यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या आगामी टप्प्यांचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.
तिसऱ्या मार्गिकेच्या कामाला गती देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने या विशेष ब्लॉक कालावधीत मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आणि अत्याधुनिक यंत्र सामग्री युद्ध पातळीवर कामाला लावली होती. नियोजित कालावधीनुसार अप आणि डाऊन मुख्य मार्गावरील क्रॉसओव्हर पॉईंट क्रमांक २९२ ए आणि २९२ बी अत्यंत काळजी पूर्वक आणि सुरक्षितपणे हटविण्यात आले. त्यानंतर संबंधित रेल्वे मार्गिकेचा तो भाग पूर्णपणे सपाट करून ‘प्लेन ट्रॅक’मध्ये बदलण्यात आला. या तांत्रिक प्रक्रिये दरम्यान ६० किलो वजनाच्या रुळांवर चार ठिकाणी वेल्डिंगचे काम पूर्ण करण्यात आले असून, सुरक्षेच्या दृष्टीने सहा ग्लूड जॉइंट्स देखील यशस्वीरीत्या बसवण्यात आले. याशिवाय, सिग्नलिंग आणि दूरसंचार विभागाशी संबंधित आवश्यक तांत्रिक बाबी आणि ट्रॅक सर्किटमधील फेरबदलही वेळेत पूर्ण करण्यात आले, ज्यामुळे पुढील टप्प्यातील स्लीव्हिंग, कटिंग आणि कनेक्शनची कामे अत्यंत सुलभ होणार आहेत.
हे कठीण आणि तांत्रिक दृष्ट्या संवेदनशील काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मोठी तयारी केली होती. या कामासाठी सुमारे २५० हून अधिक कुशल कामगार प्रत्यक्ष क्षेत्रफळावर उतरले होते, तर त्यांना मदत करण्यासाठी पाच जेसीबी, दोन पोकलेन आणि दोन हायड्रा यांसारख्या मोठ्या यंत्रांचा प्रभावी वापर करण्यात आला. ब्लॉक कालावधीत रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व तांत्रिक कामे अत्यंत समन्वयाने पार पाडण्यात आली. या यशस्वी टप्प्यामुळे हडपसर-घोरपडी तिसऱ्या मार्गिकेच्या उभारणीतील एक मोठा टप्पा पार पडल्याचे मानले जात आहे.
या यशस्वी सुरुवाती नंतर रेल्वे प्रशासनाकडून पुढील टप्प्यातील कामांचे नियोजन अंतिम करण्यात आले आहे. आगामी काळात अतिरिक्त रेल्वे मार्गिकांच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम वेगाने केले जाणार असून, त्यासोबतच अत्याधुनिक सिग्नलिंग आणि दूरसंचार यंत्रणेचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला जाईल. अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित विविध तांत्रिक कामे, रेल्वे रुळांची सुरक्षित जोडणी आणि गुणवत्तापूर्ण साहित्य संकलन यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि वाहतूक ब्लॉकच्या प्रभावी वापराला प्राधान्य देत टप्प्या टप्प्याने हा संपूर्ण प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी रेल्वे यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे.
