- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- महाराष्ट्रात बालआरोग्याची मोठी मोहीम; ९४ लाख बालकांची तपासणी, ६.५८ लाख मुलांवर उपचार सुरू
महाराष्ट्रात बालआरोग्याची मोठी मोहीम; ९४ लाख बालकांची तपासणी, ६.५८ लाख मुलांवर उपचार सुरू
महाराष्ट्रात 'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा' अंतर्गत ९४ लाख बालकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली असून ६.५८ लाख मुलांवर उपचार सुरू आहेत.
मुंबई: राज्यातील बालकांमधील आजारांचे लवकरात लवकर निदान करून त्यांना वेळेत आणि योग्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या’ (RBSK) चालू आर्थिक वर्षातील अंमलबजावणीची आकडेवारी समोर आली आहे. या नव्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत राज्यभरात तब्बल ९४ लाख ८४ हजारांहून अधिक बालकांची आणि विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या व्यापक मोहिमे दरम्यान सुमारे साडेसहा लाखांहून अधिक बालकांमध्ये विविध प्रकारच्या आरोग्य विषयक समस्या असल्याचे निष्पन्न झाले असून, वेळेवर निदान झाल्यामुळे अनेक बालकांच्या गंभीर आजारांवरील शस्त्रक्रियांना मोठे यश आल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जन्मापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या बालकांमध्ये जन्मजात व्यंग, बालपणातील आजार, शरीरातील पोषणाची कमतरता आणि विकासात्मक विलंब या चार प्रमुख बाबींचे प्राथमिक स्तरावरच निदान करण्यावर भर दिला जातो. या अंतर्गत नवजात बालकांची जन्माच्या ठिकाणी, ६ आठवडे ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची अंगणवाडीत, तर ६ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची शासकीय व अनुदानित शाळांमध्ये जाऊन वैद्यकीय तपासणी केली जाते. चालू वर्षातील १ एप्रिल ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत मिळालेल्या आकडेवारीनुसार, अंगणवाडी स्तरावर ६० लाख ९ हजार ७५६ बालकांच्या तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, त्यापैकी ४१ लाख २८ हजार ६७४ बालकांची प्रत्यक्ष तपासणी पूर्ण झाली असून, उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण ६९ टक्के इतके आहे. तसेच, राज्यातील १ लाख १० हजार ३६४ अंगणवाडी केंद्रांपैकी ८९ हजार ४२ केंद्रांवर जाऊन ही तपासणी करण्यात आली आहे. दुसरीकडे, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या तपासणीचे प्रमाण काहीसे कमी असल्याचे दिसून आले आहे. १ कोटी २४ लाख ४३ हजार ८८९ विद्यार्थ्यांच्या तपासणीचे मोठे उद्दिष्ट असताना, प्रत्यक्षात ५३ लाख ५५ हजार ४३१ विद्यार्थ्यांचीच आरोग्य तपासणी झाली असून, हे प्रमाण ४३ टक्के आहे. राज्यातील एकूण ८८ हजार २७८ शाळांपैकी ५९ हजार ४९४ शाळांमध्ये पथकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची तपासणी पूर्ण केली आहे.
या व्यापक आरोग्य तपासणी मोहिमे दरम्यान राज्यातील तब्बल ६ लाख ५८ हजार ३८४ बालकांमध्ये विविध आजार व आरोग्यविषयक समस्या असल्याचे आढळून आले आहे. तपासणीत कोणतीही गंभीर किंवा गुंतागुंतीची स्थिती आढळलेल्या बालकांना पुढील उच्च दर्जाच्या उपचारासाठी तात्काळ संदर्भित (Refer) केले जाते. या उपचारांच्या टप्प्यावर प्रशासनाकडून शस्त्रक्रियांना प्रचंड वेग देण्यात आला आहे. उपलब्ध आकडेवारी नुसार, एप्रिल ते ऑगस्ट २०२६ या अवधीत एकूण ८२० हृदयशस्त्रक्रिया निश्चित करण्यात आल्या होत्या, त्यापैकी तब्बल ८१० हृदयशस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. याशिवाय इतर गंभीर आजारांवरील शस्त्रक्रियांसाठी निश्चित केलेल्या ७ हजार २५९ लक्ष्यापैकी ७ हजार २५२ शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत, जी बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे.
राज्यात या आरोग्य मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एकूण १ हजार १९६ मोबाइल आरोग्य पथके अहोरात्र कार्यरत आहेत. प्रत्येक पथकामध्ये दोन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी, एक एएनएम (ANM) आणि एक औषधनिर्माता (Pharmacist) यांचा समावेश असतो, जे प्रत्यक्ष गावात, अंगणवाड्यांमध्ये आणि शाळांमध्ये जाऊन बालकांची आरोग्य तपासणी पार पाडतात. या संपूर्ण यंत्रणेत अधिक पारदर्शकता, गती आणि सुलभता आणण्यासाठी १ एप्रिल २०२६ पासून ‘आरबीएसके २.०’ (RBSK 2.0) हे विशेष पोर्टल सुरू करण्यात आले आहे. मोबाइल आरोग्य पथक, जिल्हा आरबीएसके आणि राज्य आरबीएसके अशा तीन प्रमुख स्तरांवर या पोर्टलचा प्रभावी वापर केला जात असून, यामुळे बालकांच्या आरोग्याचा अचूक डेटा संकलित करणे आणि वेळेत योग्य उपचार पोहोचवणे सुकर झाले आहे. या व्यापक तपासणी आणि उपचार मोहिमेमुळे ग्रामीण व शहरी भागातील बालकांच्या आरोग्याला एक भक्कम सुरक्षा कवच मिळाले आहे.
