- Hindi News
- पुणे
- पुणेकरांनो सावधान! कचरा टाकणे, थुंकणे महागणार; महापालिका दंडाची रक्कम वाढवणार
पुणेकरांनो सावधान! कचरा टाकणे, थुंकणे महागणार; महापालिका दंडाची रक्कम वाढवणार
पुणे शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे आणि अस्वच्छता पसरवणाऱ्यांविरुद्ध पुणे महापालिका कठोर पावले उचलणार असून दंडाची रक्कम वाढवणार आहे.
पुणे: पुणे शहरात सार्वजनिक स्वच्छता कायम राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये शिस्त रुजवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने (PMC) आता अत्यंत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, विनासंकोच थुंकणे, उघड्यावर लघुशंका करणे किंवा बेकायदेशीरपणे बांधकामाचा राडारोडा (Debris) टाकून शहराचे सौंदर्य विद्रूप करणाऱ्यांवर आता आणखी मोठा भुर्दंड पडणार आहे. सध्या आकारला जाणारा दंड अपुरा पडत असल्याने महापालिकेने या दंडाच्या रकमेत घसघशीत वाढ करण्याची जोरदार तयारी सुरू केली असून, लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयामुळे नियमभंग करणाऱ्यांच्या खिशाला मोठी चाप बसणार असून, पुणेकरांनी स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शहरात घनकचरा व्यवस्थापनांतर्गत महापालिकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या धडक मोहिमेची आकडेवारी अत्यंत बोलकी आहे. चालू वर्षातील जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नियम मोडणाऱ्यांवर तब्बल १६ हजार ५३२ कारवाया केल्या आहेत. या धडक मोहिमे दरम्यान बेशिस्त नागरिकांकडून एकूण १ कोटी ८७ लाख ८२ हजार ३२५ रुपयांचा विक्रमी दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक कारवाया या सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे आणि अस्वच्छता पसरवल्या प्रकरणी करण्यात आल्या असून, अशा ११ हजार ४९९ प्रकरणांमध्ये तब्बल ९० लाख ३६ हजार ९६१ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय, शहरात बांधकामाचा राडारोडा उघड्यावर टाकून परिसर मलीन करणाऱ्या २५६ जणांवर कारवाई करत तब्बल ४६ लाख ४४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. प्लास्टिक विरोधी मोहिमेतही कडक भूमिका घेत ५९१ प्रकरणांत ३ हजार ४१६ किलोहून अधिक प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले आणि ३१ लाख ५१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच, सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्या २ हजार ८२१ जणांकडून ५ लाख ७३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या वर्षभरातील कारवाईचा आढावा घेतल्यास, मे महिन्यात प्रशासनाने सर्वाधिक आक्रमक भूमिका घेत तब्बल ३६ लाख ७१ हजार ९६५ रुपयांची दंडवसुली केली होती, तर फेब्रुवारी महिन्यात सर्वाधिक २ हजार ९६३ जणांच्या पावत्या फाडण्यात आल्या होत्या. याशिवाय, कचरा जाळल्या प्रकरणी ४९ प्रकरणांत ३ लाख ३० हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्या प्रकरणी १८८ प्रकरणांत १ लाख ८७ हजार ३०० रुपये आणि ओला-सुका कचरा वर्गीकृत करून न दिल्या प्रकरणी १ हजार ६ प्रकरणांत २ लाख ८४ हजार ७४० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सध्या थुंकणे, अस्वच्छता करणे आणि उघड्यावर कचरा टाकणे यासाठी ५०० ते १ हजार रुपयांपर्यंत, तर राडारोडा टाकण्यासाठी २५ हजार रुपयां पर्यंतचा दंड आकारला जातो.
सध्या महापालिके कडून २०१६ च्या घनकचरा व्यवस्थापन नियमा नुसार दंडाची आकारणी केली जात आहे. मात्र, या दरांना जवळपास दहा वर्षे पूर्ण झाली असल्याने आणि नागरिका मधील बेशिस्त कमी होत नसल्याने दंडाच्या रकमेत वाढ करणे गरजेचे बनले आहे. याबाबत महापालिका आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली जाणार असून, त्यानंतर दंडाच्या नव्या दरांची घोषणा केली जाईल, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संतोष वारूळे यांनी दिली आहे. त्यामुळे यापुढे पुणेकरांनी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास खिशाला अधिक मोठी आर्थिक झळ बसणार असून, पुणे शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागणे गरजेचे बनले आहे.
