- Hindi News
- सातारा
- १९ वर्षीय तरुणीच्या हत्येचे गूढ अखेर उकलले; सातारा पोलिसांनी वडील आणि काकांना केली अटक
१९ वर्षीय तरुणीच्या हत्येचे गूढ अखेर उकलले; सातारा पोलिसांनी वडील आणि काकांना केली अटक
सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे आढळलेल्या १९ वर्षीय तरुणीच्या हत्येचे गूढ उकलले असून, सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मृत मुलीच्या वडील व चुलत्याला अटक केली आहे.
सातारा: सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरात काही दिवसांपूर्वी एका अज्ञात तरुणीचा संशयास्पदरीत्या मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृतदेहाची कोणतीही ओळख नसताना आणि तपासासाठी हातात कोणताही ठोस धागादोरा नसताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तब्बल १५ दिवस अहोरात्र कसून मेहनत घेत या गुन्ह्याचे गूढ उकलले आहे. या प्रकरणात धक्कादायक सत्य समोर आले असून, मृत तरुणीचे पोटचे वडील आणि चुलत्यानेच (काकांनी) घरगुती कारणांमुळे आणि वाढत्या त्रासाला कंटाळून तिचा अत्यंत निर्घृण खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दोघा नराधम आरोपींना बेड्या ठोकल्या असून, या थरारक उलगड्याने सर्वत्र संताप व आश्चर्य व्यक्त होत आहे.
१४ सप्टेंबर २०२६ रोजी शिरवळ ते राजेवाडी जाणाऱ्या मार्गावर एका निर्जन ठिकाणी १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्राथमिक तपास सुरू करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी या प्रकरणाचा बारकाईने तपास करण्याचे कडक आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा समांतर व तांत्रिक तपास सुरू केला.
सुरुवातीला मृत मुलीची कोणतीही ओळख पटत नसल्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, तपास पथकाने कोणतीही हार न मान रता शिरवळ, भोर, पुणे, कापूरहोळ, नसरापूर ते सातारा-पुणे महामार्गावरील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. सलग १६ दिवस या भागात ठाण मांडून पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा माग काढला. या वाहनाच्या आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी मृत मुलीची ओळख पटवली. मयत तरुणीचे नाव कु. हर्षदा हनुमंत जाधव (वय १९, रा. लक्ष्मीविष्णु पार्क, जांभुळवाडी, आंबेगाव खुर्द, पुणे) असल्याचे स्पष्ट झाले.
वडिलांनी आणि चुलत्यानेच रचला होता घात
तरुणीची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी तिचा माग काढत तिचे वडील हनुमंत दामोदर जाधव आणि चुलता बाळू अंकुश जाधव यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी दिलेली माहिती अंगावर काटा आणणारी होती. मयत मुलगी हर्षदा ही घरातील लोकांना सतत शिवीगाळ करणे, वाईट संवर्गात राहून रात्रभर बाहेर फिरणे, विविध व्यसनांच्या आहारी जाणे आणि घरातील सदस्यांनाच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देणे, अशा प्रकारे कुटुंबाला नाहक त्रास देत होती. या रोजच्या त्रासाला आणि कुटुंबाची होणारी बदनामी सहन न झाल्याने वडील आणि चुलत्याने तिचा काटा काढण्याचा क्रूर कट रचला.
योजने नुसार, आरोपींनी हर्षदाला बाहेर हॉटेलमध्ये जेवणाला जाण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून शिरवळ परिसरातील निर्जन ठिकाणी नेले. तिथे तिच्या डोळ्यात आणि तोंडात लाल तिखट (चटणी) टाकून, हाताने तिचे तोंड व नाक दाबून तिचा अत्यंत निर्घृणपणे खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करून मृतदेह तिथेच फेकून आरोपी पसार झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपल्या कौशल्यपूर्ण व अहोरात्र तपासाच्या बळावर या क्लिष्ट गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी शिरवळ पोलिसांच्या ताब्यात दिले असून, त्यांच्या विरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात खुन्सह पुरावा नष्ट केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमा नुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
