- Hindi News
- सातारा
- दहिवडी बार असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी अभिजित गोसावी, उपाध्यक्षपदी विकास पाटोळे
दहिवडी बार असोसिएशनची नवी कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी अभिजित गोसावी, उपाध्यक्षपदी विकास पाटोळे
दहिवडी ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. अभिजित गोसावी व उपाध्यक्षपदी ॲड. विकास पाटोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
दहिवडी: दहिवडी ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया अत्यंत सलोख्याने आणि सर्वसंमतीने पार पडली आहे. कायदेशीर व न्यायिक वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या या निवडणुकीत संघटनेच्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी ॲड. अभिजित आप्पासो गोसावी (राऊत) यांची, तर उपाध्यक्षपदी ॲड. विकास मच्छिंद्र पाटोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे दहिवडी न्यायालयाच्या बार असोसिएशनमध्ये आनंदाचे वातावरण असून, विधिज्ञ वर्गाकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दहिवडी ॲडव्होकेट बार असोसिएशनची महत्त्वाची सर्वसाधारण सभा १५ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडली. या सभेत संघटनेच्या आगामी वाटचाली बाबत आणि विविध प्रशासकीय विषयांवर सर्वपक्षीय वकिलांनी सविस्तर चर्चा केली. चर्चेनंतर एकमुखाने पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा विषय पुढाकारात घेण्यात आला. सर्व सदस्यांच्या एकमताने व संमतीने नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या संपूर्ण निवड प्रक्रियेत ॲड. जिजाबा नारायण जाधव यांनी सूचक म्हणून, तर ॲड. श्रीमंत शंकर पोळ यांनी अनुमोदक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या उपस्थितीत मांडण्यात आलेला हा निवड प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
नवनिर्वाचित कार्यकारिणीचा कार्यकाळ एक वर्षाचा असणार असून, या कालावधीत वकिलांच्या व्यावसायिक अडी अडचणी सोडवणे, न्यायालयाच्या कामकाजात सुटसुटीतपणा आणणे आणि बार असोसिएशनच्या माध्यमातून विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्यावर भर दिला जाणार आहे. जाहीर करण्यात आलेल्या नव्या कार्यकारिणी मध्ये महिला प्रतिनिधी म्हणून ॲड. सुजाता सुभाष बागल यांची, तर सचिव पदाची जबाबदारी ॲड. किशोर दिलीप खरात यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे बार असोसिएशनच्या कामकाजात अधिक गतिशीलता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या सर्वसाधारण सभेच्या आणि निवड प्रक्रियेच्या यशस्वी आयोजनासाठी सी. पी. कुलकर्णी आणि ॲड. संदेश भास्करराव गुंडगे यांचे मोलाचे व मार्गदर्शक सहकार्य लाभले. तसेच, ॲड. रामचंद्र ढवळे यांनी विशेष उपस्थित राहून नवनिर्वाचित कार्यकारिणीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील कायदेशीर व सामाजिक वाटचालीस सदिच्छा दिल्या. या बिनविरोध निवडीमुळे दहिवडी बार असोसिएशनमध्ये उत्साहाचे वातावरण असून, वकील वर्गाच्या हिट रक्षणासाठी नवीन कार्यकारिणी प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
