- Hindi News
- प्रांत (महाराष्ट्र)
- नियम आधीपासूनच होते, पालन होत नव्हते हीच शोकांतिका; तुकाराम मुंढेंचे एफडीएच्या धडाकेबाज कारवाईला समर...
नियम आधीपासूनच होते, पालन होत नव्हते हीच शोकांतिका; तुकाराम मुंढेंचे एफडीएच्या धडाकेबाज कारवाईला समर्थन
अन्न सुरक्षेचे नियम आधीपासूनच होते पण त्यांचे पालन न होणे ही शोकांतिका आहे, असे सांगत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचे समर्थन केले.
मुंबई :आपल्या शिस्तप्रिय, धडाकेबाज आणि अत्यंत कठोर प्रशासकीय कार्यशैलीसाठी संपूर्ण देशात ओळखले जाणारे ज्येष्ठ आयएएस अधिकारी तथा महाराष्ट्राचे अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुन्हा एकदा आपल्या परखड आणि स्पष्टवक्त्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. गुजरातच्या गांधीनगर येथील एका विशेष कार्यक्रमात बोलताना त्यांनी अन्न सुरक्षेच्या नियमांवर, प्रशासकीय अंमलबजावणीवर आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे बिघडणाऱ्या आरोग्यावर अत्यंत मार्मिक भाष्य केले. देशात अन्न सुरक्षेचे कडक कायदे आणि नियम स्वातंत्र्या पासून किंवा आधीपासूनच अस्तित्वात होते, परंतु त्यांचे गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे पालनच केले जात नव्हते, हीच आपल्या व्यवस्था प्रणालीतील सर्वात मोठी शोकांतिका आहे, अशा शब्दांत त्यांनी थेट चपराक लगावली आहे.
यंदाच्या वर्षी मे महिन्यात एफडीए आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रात भेसळखोर, अन्न व्यवसायांमध्ये अस्वच्छता पसरवणारे घटक आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सडकून कारवाईचा बडगा उगारला आहे. या पार्श्वभूमीवर गांधीनगरमधील कार्यक्रमात बोलताना त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यांनी स्पष्ट केले की, अन्न सुरक्षेची ही कठोर मोहीम कोणतीही व्यक्ती, विशिष्ट व्यापारी किंवा हॉटेल चालकाला वैयक्तिकरित्या लक्ष्य करण्यासाठी अजिबात राबवली जात नाही, तर केवळ आणि केवळ सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कायद्याचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी आहे. पूर्वीपासूनच कायदे कागदावर उपलब्ध होते, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या अभावामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू होता, असा सूर त्यांनी आपल्या वक्तिव्यातून आळवला.
सध्याच्या बदलत्या जीवन शैलीवर आणि आरोग्याच्या गंभीर प्रश्नांवर चिंता व्यक्त करताना तुकाराम मुंढे यांनी खाण्यापिण्याच्या सवयींवर प्रकाश टाकला. समाजात वेगाने पाय पसरत चाललेले डायबिटीस (मधुमेह), उच्च रक्तदाब (ब्लड प्रेशर) आणि हृदयविकारा सारख्या जीवन शैली विषयक आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढण्यामागे आपण रोज काय खातो आणि पितो, याचा अत्यंत थेट संबंध आहे, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात देशात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण तब्बल ६५ ते ७० टक्के इतके होते, परंतु आज वैद्यकीय विज्ञान प्रगत झाल्यानंतरही बिगर-संसर्गजन्य आजारांचे प्रमाण भयानक प्रमाणात वाढले आहे. लोक आजार झाल्यावर महागड्या उपचारांच्या मागे धावतात, परंतु आपल्या रोजच्या आहारात नेमके काय जात आहे आणि त्याची गुणवत्ता काय आहे, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्रात पदभार स्वीकारल्या पासून तुकाराम मुंढे यांनी खाद्य पदार्थां मधील भेसळ, हॉटेल्समधील अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव आणि निकृष्ट दर्जाच्या साहित्यावर थेट परवाने रद्द करण्यापर्यंतच्या कठोर कारवाया केल्या आहेत. त्यांच्या या निडर आणि तडफदार कारभाराबद्दल सर्वसामान्य नागरिका पासून ते अनेक थरांमधून त्यांच्याबद्दल प्रचंड आदर व्यक्त केला जात असून त्यांच्या कामगिरीचे नेहमीच कौतुक होते. गांधीनगर मधील या ताज्या वक्तव्यामुळे अन्न सुरक्षेचा हा लढा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण देशातील सार्वजनिक आरोग्याशी जोडलेला एक महत्त्वाचा विषय असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, त्यांच्या या भूमिकेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
