- Hindi News
- पुणे
- ५० हजारांची लाच घेताना पुणे पालिकेचा क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; विश्रांतवाडी पो...
५० हजारांची लाच घेताना पुणे पालिकेचा क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात; विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे (विशेष प्रतिनिधी):
हॉस्पिटलमधील त्रुटींवर पांघरूण घालण्यासाठी आणि नोंदणी रद्द न करण्यासाठी तब्बल ५० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले आहे. डॉ. ज्ञानेश्वर शिवराम चकोर (वय ५०, रा. शुभ गेटवे, विमान नगर, पुणे) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नेमकी घटना काय?
तक्रारदार (वय ४६) हे वैद्यकीय व्यावसायिक असून धानोरी परिसरामध्ये त्यांचे हॉस्पिटल आहे. त्यांच्या हॉस्पिटलमधील कामात अनियमितता असल्याबाबत पुणे महानगरपालिकेच्या नगर रोड क्षेत्रीय कार्यालयात एक तक्रार अर्ज आला होता. या अर्जाच्या चौकशीची जबाबदारी वर्ग-२ चे अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर चकोर यांच्याकडे होती.
दिनांक १८ सप्टेंबर २०२६ रोजी डॉ. चकोर यांनी तक्रारदारांच्या हॉस्पिटलला भेट दिली. त्यावेळी त्यांनी तक्रारदाराला धाक दाखवला की, "हॉस्पिटलमधील त्रुटींचे निराकरण करावे लागेल, अन्यथा तुमचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठवेन." हा अहवाल रोखण्यासाठी त्यांनी सुरुवातीला २० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी तक्रारदाराकडून ३० हजार रुपये उकळल्यानंतर उर्वरित रकमेबाबत सोमवारी सांगतो असे त्यांनी स्पष्ट केले.
'एसीबी'ची पडताळणी आणि सापळा
सततच्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने २१ सप्टेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (पुणे) येथे रीतसर तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे २४ सप्टेंबर रोजी धानोरी येथील भैरवनाथ नगर भागात एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. पडताळणी दरम्यान डॉ. चकोर यांनी स्वतःसाठी व वरिष्ठांसाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे आणि यापूर्वी १५ हजार रुपये स्वीकारल्याची कबुली दिल्याचे उघडकीस आले.
त्यानंतर, शनिवारी (२६ सप्टेंबर २०२६) धानोरी, भैरवनगर येथील तक्रारदाराच्या हॉस्पिटलमध्ये 'एसीबी'ने सापळा रचला. तक्रारदाराच्या केबिनमध्ये ५० हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना डॉ. ज्ञानेश्वर चकोर यांना पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. दुपारी १:४७ वाजता त्यांना ताब्यात घेण्यात आले.
