एसटीच्या ‘एनसीएमसी’ कार्ड नोंदणीत पुणे प्रदेश अव्वल; ९.२६ लाखांहून अधिक नागरिकांची नोंदणी पूर्ण

एसटीच्या 'एनसीएमसी' (NCMC) कार्ड नोंदणीत पुणे प्रदेशाने ९.२६ लाखांहून अधिक नोंदणीसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

पुणे: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC Card) च्या नोंदणी प्रक्रियेमध्ये पुणे प्रदेशाने संपूर्ण राज्यात घवघवीत यश मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. राज्य शासनाच्या धोरणा नुसार महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या भरघोस सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे डिजिटल कार्ड अनिवार्य करण्यात आले असून, पुणे विभागाने यामध्ये आघाडी घेत तब्बल ९ लाख २६ हजारहून अधिक प्रवाशांची नोंदणी यशस्वी रीत्या पूर्ण केली आहे. या वाढत्या प्रतिसादामुळे एसटीचा डिजिटल प्रवास अधिकाधिक गती घेत असल्याचे दिसून येत असले, तरी दुसरीकडे कार्ड काढताना व वापरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना काही प्रमाणात कसरत करावी लागत असल्याचीही चर्चा आहे.

          एसटी महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनेंतर्गत महिलांसह ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते, तर ७५ वर्षे पूर्ण झालेल्या अमृत ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या सवलतींचा पारदर्शक आणि डिजिटल लाभ मिळण्यासाठी एनसीएमसी कार्ड काढणे बंधनकारक करण्यात आले आहे. पुणे प्रदेशांतर्गत येणाऱ्या पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या पाचही विभागांमध्ये नागरिकांनी या कार्ड नोंदणीसाठी उत्तम प्रतिसाद दिला आहे. आकडेवारी नुसार, पुणे प्रदेशात आतापर्यंत ९ लाख २६ हजार ७११ प्रवाशांची नोंदणी झाली असून, त्यापैकी ७ लाख १३ हजार ८६६ प्रवाशांना प्रत्यक्षात कार्डचे वितरणही करण्यात आले आहे. पुणे प्रदेशापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर प्रदेशात सुमारे ३० लाख, नाशिक प्रदेशात २७ लाख, अमरावतीत १९ लाख, नागपूरमध्ये १० लाख तर मुंबई विभागात सुमारे ८ लाख ७२ हजार नोंदणी झाल्याची नोंद महामंडळाकडे आहे.

         सुरुवातीला या कार्डचा वापर १ सप्टेंबरपासून सक्तीचा करण्यात आला होता; परंतु ग्रामीण भागातील प्रवाशांची होणारी गैरसोय, तांत्रिक अडचणी आणि कार्ड वितरित होणारा विलंब यामुळे प्रशासनाने या अंमलबजावणीला मुदतवाढ दिली. कार्ड नोंदणी करताना प्रामुख्याने बायोमेट्रिक पडताळणीमध्ये अनेक अडथळे येत असल्याचे समोर आले. आधार कार्डमधील माहिती आणि बोटांचे ठसे जुळत नसणे, अंगठ्याचा ठसा स्पष्ट न उमटणे, आधारला मोबाईल क्रमांक लिंक न असणे तसेच सर्व्हर डाऊन असणे किंवा इंटरनेटच्या धीम्या गतीमुळे ओटीपी न मिळणे यांसारख्या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले होते. विशेषतः ग्रामीण भागातील प्रवाशांना नोंदणी केंद्रांपर्यंत लांबचा प्रवास करावा लागल्यामुळे आणि केंद्रांवर झालेली गर्दी यामुळे ताण वाढला होता. या सर्व तांत्रिक अडचणींमुळे काही वेळा प्रवाशांना मशीनवर कार्ड न चालणे किंवा तिकीट न निघाल्यामुळे पूर्ण भाडे देऊन प्रवास करावा लागल्याच्या तक्रारीही पुढे आल्या होत्या.

         या सर्व तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणींची गंभीर दखल घेत एसटी महामंडळाने २१ सप्टेंबरपासून आधार ओटीपीद्वारे नोंदणी करण्याचा अत्यंत सुलभ पर्याय उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. असे असले तरी, मुदतवाढीच्या या कालावधीत एसटी प्रशासनाने बसमधील तिकीट काढणारी ईटीएम मशिन्स, सर्व्हर आणि डिजिटल यंत्रणा अधिक सक्षम करण्याची जोरदार मागणी प्रवाशांकडून होत आहे. सवलतीचा प्रवास कागदविरहित आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने एनसीएमसी कार्ड महत्त्वपूर्ण असले, तरी भविष्यात तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासकीय स्तरावर अधिक अचूक नियोजन करणे गरजेचे बनले आहे.

 

Edited By: Rajsita Ade

खबरें और भी हैं

अवकाशात स्पेसएक्सचा नवा विक्रम; ‘स्टारशिप’ पहिल्यांदाच कक्षेत, २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वी

Latest News

अवकाशात स्पेसएक्सचा नवा विक्रम; ‘स्टारशिप’ पहिल्यांदाच कक्षेत, २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वी अवकाशात स्पेसएक्सचा नवा विक्रम; ‘स्टारशिप’ पहिल्यांदाच कक्षेत, २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वी
इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सने स्टारशिपच्या १४व्या चाचणीत इतिहास रचत यान पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत पोहोचवले व २६ स्टारलिंक उपग्रह यशस्वीरीत्या सोडले....
महाराष्ट्रातील दुष्काळावर केंद्राचे लक्ष; शिवराजसिंह चौहान वरिष्ठ अधिकाऱ्यांसह राज्याच्या दौऱ्यावर येणार
दिवाळीच्या रेल्वे तिकिटांसाठी प्रवाशांची धावपळ; बुकिंग सुरू होताच तिकिटे फुल्ल,वेटिंग’चा मनस्ताप
एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांना शरद पवारांचा स्पष्ट नकार; यायचं असेल तर आमच्यासोबत या
हुंड्याच्या छळाचा आरोप अन् वैष्णवीचा दुर्दैवी अंत; नवविवाहित आयटी अभियंतेच्या मृत्यूने पुण्यात खळबळ

स्पेशल स्टोरी

अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश अंबाबाई मंदिर संवर्धन: मूळ ढाच्याला धक्का न लावण्याचे निर्देश
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे आदेश. किरणोत्सव आणि गरुड मंडप उभारणीबाबत विशेष सूचना.
Copyright (c) Lokprant All Rights Reserved.
Powered By Vedanta Software