- Hindi News
- पुणे
- फुरसुंगीत सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा; 31.91 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
फुरसुंगीत सुगंधित तंबाखू बनविणाऱ्या कारखान्यावर छापा; 31.91 लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक
पुणे: फुरसुंगी येथील उरुळी देवाची परिसरात बेकायदेशीरपणे सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेच्या युनिट-5 आणि अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने संयुक्त कारवाई केली. या कारवाईत सुगंधित तंबाखू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, यंत्रसामग्री तसेच अमूल कंपनीचे चीज असा एकूण 31 लाख 91 हजार 608 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 सप्टेंबर 2026 रोजी उरुळी देवाची परिसरात सुगंधित तंबाखू तयार करणारा कारखाना सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-5 मधील पोलीस अंमलदार नासिर देशमुख आणि सुधीर सोनवणे यांना मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन तिची खातरजमा केल्यानंतर कारवाईचे आदेश देण्यात आले.
त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-5च्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी तेथे अवैधरित्या सुगंधित तंबाखू तयार केला जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून संयुक्तपणे छापा टाकण्यात आला.
कारवाईदरम्यान सुगंधित तंबाखू तयार करण्यासाठी वापरले जाणारे एकूण 59 बॉक्स, पाऊच पॅकिंग मशीन, आरओ वॉटर, मेंथॉलचे बॉक्स, ग्लिसरॉल कॅन तसेच अमूल कंपनीचे 1,080 डबे चीज असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 31,91,608 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत सुशीलसिंग विश्वनाथ तोमर (वय 26) आणि उमेशसिंग रामदीन तोमर (वय 23) यांना अटक करण्यात आली आहे. दोघेही सध्या उरुळी देवाची, ता. हवेली, जि. पुणे येथील आदर्शनगर परिसरात राहत असून, त्यांचे मूळ गाव तारेनी, मोरेना, मध्य प्रदेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 442/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता 2023 मधील संबंधित कलमांसह अन्नसुरक्षा व मानदे कायदा 2006 मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-2) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट-5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पवार, सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार तसेच युनिट-5च्या पथकातील नासिर देशमुख, सुधीर सोनवणे, अमर चव्हाण, प्रताप गायकवाड, अकबर शेख, परमेश्वर कदम, शहाजी काळे, राहुल गोसावी, राहुल धमधेरे, नेत्रिका अडसूळ, जयश्री भालेराव, मयुरी पालवे आणि श्रीदेवी फाळके यांनी कारवाईत सहभाग घेतला. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अन्न प्रशासन अधिकारी नारायण सरकटे, पूजा बगाडे आणि मोहिते यांनीही कारवाईत सहभाग घेतला.
