- Hindi News
- सातारा
- जिल्हा बँकेसाठी सुनेत्राताई शिंदे यांचा उमेदवारी अर्ज; जावळीला दोन संचालकांच्या घोषणेनंतर राजकीय हाल...
जिल्हा बँकेसाठी सुनेत्राताई शिंदे यांचा उमेदवारी अर्ज; जावळीला दोन संचालकांच्या घोषणेनंतर राजकीय हालचालींना वेग
आनेवाडी: जावळी तालुक्याच्या राजकारणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. महिला प्रवर्गातून कैलासवासी माजी आमदार लालसिंगराव शिंदे यांच्या कुटुंबातील, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या माजी चेअरमन तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी संचालिका सुनेत्राताई शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे जावळी तालुक्यासह कुडाळ विभागातील राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
जावळी तालुक्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दोन संचालक पदे देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर सुनेत्राताई शिंदे यांनी महिला प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जावळीतील सहकार आणि राजकारणातील समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सुनेत्राताई शिंदे यांना सहकार क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद भूषविले असून, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका म्हणूनही यापूर्वी काम केले आहे. त्यामुळे सहकार क्षेत्रातील त्यांचा अनुभव आणि जावळी तालुक्यातील राजकीय व सामाजिक संपर्क या पार्श्वभूमीवर त्यांच्या उमेदवारीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुलबाबा भोसले, वसंतराव मानकुमरे, प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुनेत्राताई शिंदे यांच्या उमेदवारीमुळे जावळीच्या राजकारणात महिला नेतृत्वाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. विशेषतः कुडाळ विभागात त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू असून, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जावळी तालुक्याची भूमिका काय राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, जावळीला दोन संचालक पदे देण्याबाबत करण्यात आलेली घोषणा, महिला प्रवर्गातील सुनेत्राताई शिंदे यांची उमेदवारी आणि आगामी निवडणुकीतील संभाव्य राजकीय समीकरणे यामुळे जावळीतील सहकार क्षेत्रातील निवडणुकीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. आता उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर पुढील चित्र स्पष्ट होणार असून, जावळीला मिळणाऱ्या प्रतिनिधित्वाबाबत पुढील घडामोडींकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
