- Hindi News
- सातारा
- कास तलाव परिसरात स्वच्छता मोहीम; प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी व्यावसायिकांना सूचना
कास तलाव परिसरात स्वच्छता मोहीम; प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी व्यावसायिकांना सूचना
‘महाश्रमदान – एक दिवस, एक साथ, एक तास’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; जलस्रोत स्वच्छ ठेवण्याचे आवाहन
आनेवाडी, ता. जावळी : ‘स्वच्छता ही सेवा २०२६’ अंतर्गत ‘महाश्रमदान – एक दिवस, एक साथ, एक तास’ अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत अंधारी-कास येथे शिवकालीन कास तलाव परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तलाव परिसरातील मोठ्या प्रमाणातील प्लास्टिक कचरा संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आला.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद यांनी कास तलाव परिसरातील हॉटेल व्यावसायिक व दुकानदारांशी संवाद साधून घनकचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. कास तलाव हे महत्त्वाचे जलस्रोत तसेच पर्यटनस्थळ असल्याने त्याचे स्वच्छता, संवर्धन आणि प्रदूषणमुक्ती यासाठी नागरिक, व्यावसायिक आणि प्रशासनाने सातत्याने सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कास परिसरात निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन संबंधित हॉटेल व्यावसायिक व दुकानदारांनी स्वतःच्या पातळीवर करावे. तसेच आठवड्यातून किमान एक दिवस नियमित स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ ठेवावा, अशा सूचना विश्वास सिद यांनी दिल्या. गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनीही जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी नागरिक, व्यावसायिक आणि स्थानिक प्रशासनाने सामूहिक जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्लास्टिक कचऱ्यामुळे जलस्रोतांचे होणारे प्रदूषण, पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम आणि परिसराच्या सौंदर्यावर होणारा परिणाम याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. प्लास्टिकचे सूक्ष्मकण पाण्यात मिसळल्यास जलचर सजीवांना धोका निर्माण होण्यासोबतच पाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होण्याची शक्यता असल्याने ‘कचरा निर्माण होऊ नये आणि निर्माण झाल्यास त्याचे योग्य वर्गीकरण व व्यवस्थापन करावे’ हा दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले.
या स्वच्छता मोहिमेत जिल्हा तज्ज्ञ राजेश भोसले, विस्तार अधिकारी गोविंद माने, बी.आर.सी. मनोज खेडकर, ग्रामपंचायत अधिकारी सुधीर जाधव तसेच प्रकाश माने, ज्ञानेश्वर धूम, समाधान जाधव, युवराज पवार यांच्यासह कास वन व्यवस्थापन समितीचे सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, हॉटेल व्यावसायिक, दुकानदार आणि नागरिकांनी सहभाग घेतला.
